सदर अनुभव सत्य घटनेवर आधारित...(वाद नको म्हणून नावे बदललेली आहेत)
लघु कथा अनुभव आणि शब्द संकलन - अन्या
त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी अन्याला हऱ्याचा फोन आला...
हऱ्या - भाऊ, कुठेय तू...?
अन्या - अरे चौकात कट्ट्यावर...!
मग इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांचाच एक मित्र, रोह्याचा कॅफेमध्ये भेटण्याचे ठरते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गरमागरम चहा-कॉफी पिण्याची मजा काही निराळीच..!
अन्याला पंचवटीतून पिक केल्यानंतर अन्या, हऱ्या अन् त्यांचा आणखीन एक मित्र, कल्प्या असे तिघे रोह्याच्या कॅफेमध्ये पोहचले.
धूम्रपान (स्मोकिंग) करण्याचीही मुभा असल्याने या कॅफेमध्ये आजकालचे अनेक कुल तरुण-तरुणी असे कपल्स, मित्र-मैत्रिणी बसलेेले होते.
कॅफेत जाता क्षणीच अन्याची नजर त्याच कॅफेमध्ये असलेल्या सात जणांच्या ग्रुप मध्ये बसलेल्या टेबलकडे गेली, जो मागच्या बाजूला भिंतीला लावून होता. दोन मुली आणि पाच मुले असा तो ग्रुप ! ती मुले त्या दोघींना घेरून बसलेले होते. एक-एक असा सुट्टा पास करत मुलीही त्याचा आनंद घेत होत्या.
अन्याच्या लक्षात आले की, त्या दोन मुली इतर पाच मुलांपेक्षा वयाने अगदीच लहान असाव्यात.
अन्या - हऱ्या, या पोरी लैच, म्हणजे ११ वी-१२ वी च्याच दिसु राहिल्या बरं का...!
हऱ्या - हा राव...!
त्या ग्रुपला आता यात आपण काही वेगळं करतोय अशी काही भावना नव्हती. हे पाहून अन्याला खूप राग आला.
आपल्याही घरी आपली लहान बहीण आहे, मैत्रिणी आहेत असे विचार त्याच्या मनात सतत घोळत होते. इतक्या लहान वयात यांच्या आयुष्याचे असे वाटोळे होताना पाहून त्याला आतून अतोनात दुःखही होत होते. आणि याच जाणिवेतून अन्या बेधडक त्यांच्या टेबलजवळ जाऊन पोहचला. तर त्यातल्या एका मुलीने सिगारेटचा एक हुंकार मारत त्यातून धूर सोडला....तो सरळ त्याच्या तोंडावरच...!
अन्या - (हाताच्या मुठी आवळत रागानेच तिच्याकडे बघत राहिला)
तेवढ्यात....
दुसरी मुलगी (अन्याला) - काय बघतोस? (तिचा कटाक्ष पण असा जळजळीतच...)
अन्या अन् हऱ्याचा संताप पाहून...
कल्प्या (अन्या अन् हऱ्याला) - ये....दोघेही या बरं इकडे. गुदमरून द्या त्याच धुरांंत त्यांना...!
पण अन्याचा राग काही काबूत नव्हता. तोही तिथून हलला नाही. तसा त्यातला एक मुलगा उठला आणि त्याने अन्याला जोरात मागे ढकललं. मग अन्यानेही (तिच्या देऊ शकला नाही म्हणून) त्या मुलाच्या तोंडात दिली.
मग कदाचित लाज वाटली असेल म्हणून की काय एक-एक करून ते सगळे कॅफेच्या बाहेर पडायला लागले पण तेही गुर्मितच...
©️वर्षा_शिदोरे