शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

खरं पाहिलं तर बाह्यरूपी सौंदर्य महत्वाचं वाटतं अनेकांना आणि भुरळही घालतं अनेकदा....ते कधी उघड नसेल व्यक्त केलं जात पण मनात कुठेतरी दडलेलं असतं. कधी आपल्याला वागण्या-बोलण्यातून जाणवतं. मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं-मनाचं जे हृदयाला साद घालतं ते की चेहऱ्यावरचं जे अगदीच असतं उघड....कसं बरं ठरवणार ?

व्यक्तिमत्व पेहरावाने खुलतं खरंच आहे हे ! पण पेहरावही आपल्या दिसण्या-वागण्याला साजेसा असावा लागतो, हे नव्यानं सांगायला नको.... ते म्हणतात ना....अंगापेक्षा बोंगा नसावा मोठा !

अंतर्मन शुद्ध असेल तर सभोवतालच्या वातावरणासोबत आपलं व्यक्तिमत्वही खुलतं. आपल्या मनावरचा चांगल्या-वाईट विचारांचा पगडा खूप मोठा आणि विस्तृत तसा. पण विचारांचं काय असतं, नसेल पटत तर झुगारून पुढे जाणंच योग्य ठरतं....फक्त आपला निर्णयही योग्य असू शकतो हा विश्वास कायम असणं महत्वाचं !

आपल्यासाठी आपलं अथवा दुसऱ्याचं कोणतं सौंदर्य का म्हणून महत्वाचं ते आपण आपलं ठरवावं. कुणी कितीही गाथा गायली, ब्रह्मज्ञान सांगितलं तरीही आपल्या विचारांचं योग्य-अयोग्य असणं शेवटी आपल्या मनाला लवकर पटतं....म्हणून कुणाचंच ऐकू नये असे मुळीच नाही....निर्णय घेण्याची योग्यता प्रत्येकात असते. ती वेळीच ओळखावी.आपला कोणता गुण कुठे आणि केव्हा वापरावा याचं ज्ञानही यातूनच मिळतं....'चरित्र' नावाचा ग्रंथ याच विचारांतून घडतो, फुलतो....!!!


(स्वलिखित -by self)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा