सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

 समाधानी मनाला पुन्हा पुन्हा समाधान देणारं....
 
आयुष्याच्या या अखंड डायरीवर
कधी नुसत्याच रंगहीन रेघोट्या
तर कधी सुंदर क्षणांची रंगीन झालर
तर कधी नुसताच शब्दांचा प्रवास
तर कधी शब्दहीन आसवांचा पाऊस
उत्कंठेच्या खाईत कोरं अपूर्ण स्वप्न
मात्र पंख त्याला याच कोऱ्या आशेचे

डायरीचं प्रत्येक पान वेगवेगळं रंगवलेलं
तरीही असतं प्रवासातलं आपलंसं असलेलं
योग्य-अयोग्याचं ठिकाण अजून न सापडलेलं
चांगल्या-वाईटाला फक्त एक जागा मिळालेली
त्यांना सामोरं जाणारी अशी स्वप्नांची वाट
अपूर्णतेच्या पंखांना बळ देता येणारं अवकाश
शोधावं लागतं आपलं आपल्यालाच

त्या पानांवरची शाई पुसून जाईपर्यंत 

असतात ते जिवंत शब्द....पानावर साचलेले
पण ते पुसले तरीही मनावरचं दडपण नसतं पुसत
म्हणून शोधावं लागतं असं काहीतरी साधन
जे मनाला घालू शकेल समाधानाचे पांघरून
डायरीवरचं न पुसता जगायचं खरं करण्यासाठी
समाधानी मनाला पुन्हा पुन्हा समाधान देणारं....

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा