शुक्रवार, ५ जून, २०२०

कधी कधी आठवणींच्या रानवनात अनेक क्षण भेटतात. आठवणीत का होईना पुन्हा जगण्याची संधी फक्त काही अंतरावर असते पण...पण शेवटी राहूनच जाते !!!


जुने दिवस आठवता...

जुने दिवस आठवता, पुन्हा एकदा
का नाही चिवडले एकत्र ताटात घास
का नाही निजले आईच्या शांत कुशीत
का नाही ऐकले बाबांचे प्रेमळ कटू शब्द
का नाही जगले आजी-आजोबांसमवेत
का नाही लुटले बालमनाचे निरागस हास्य
का नाही रुसले भावा-बहिणींच्या प्रेमात
का नाही उधळले मैत्रीचे वात्रटपणातले रंग
का नाही स्मरले भांडणातले अबोल भाव
का नाही केले जवळ दुराव्यातल्या नात्यांना
का नाही विसरले निष्ठुर शत्रुत्वाचे आघात
का नाही आले जपता सोन्यासारखी माणसं
का नाही हरवले कधी काळजीच्या विश्वात
का नाही शोधले एकदा स्वतःला स्वतःत
का नाही रमले अंतर्मनाच्या सुख-दुःखात
का नाही न्याहाळले जखडलेल्या भावनांना
का नाही विस्कटले वेळीच वेदनादायी डाव
का नाही विचारले हरवलेल्या शब्दांना
का नाही केले उघड हळव्या आसवांना
का नाही कवटाळले छातीशी स्वमनाला
का नाही घेतले मिठीत भयभीत हृदयाला
का नाही आठवले आठवणींच्या कुपीला
का नाही वेचले राहून गेलेल्या क्षणांना  


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा