शुक्रवार, ५ जून, २०२०

कधी कधी आठवणींच्या रानवनात अनेक क्षण भेटतात. आठवणीत का होईना पुन्हा जगण्याची संधी फक्त काही अंतरावर असते पण...पण शेवटी राहूनच जाते !!!


जुने दिवस आठवता...

जुने दिवस आठवता, पुन्हा एकदा
का नाही चिवडले एकत्र ताटात घास
का नाही निजले आईच्या शांत कुशीत
का नाही ऐकले बाबांचे प्रेमळ कटू शब्द
का नाही जगले आजी-आजोबांसमवेत
का नाही लुटले बालमनाचे निरागस हास्य
का नाही रुसले भावा-बहिणींच्या प्रेमात
का नाही उधळले मैत्रीचे वात्रटपणातले रंग
का नाही स्मरले भांडणातले अबोल भाव
का नाही केले जवळ दुराव्यातल्या नात्यांना
का नाही विसरले निष्ठुर शत्रुत्वाचे आघात
का नाही आले जपता सोन्यासारखी माणसं
का नाही हरवले कधी काळजीच्या विश्वात
का नाही शोधले एकदा स्वतःला स्वतःत
का नाही रमले अंतर्मनाच्या सुख-दुःखात
का नाही न्याहाळले जखडलेल्या भावनांना
का नाही विस्कटले वेळीच वेदनादायी डाव
का नाही विचारले हरवलेल्या शब्दांना
का नाही केले उघड हळव्या आसवांना
का नाही कवटाळले छातीशी स्वमनाला
का नाही घेतले मिठीत भयभीत हृदयाला
का नाही आठवले आठवणींच्या कुपीला
का नाही वेचले राहून गेलेल्या क्षणांना  


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

कधी कधी आपलंच मन आपल्याला खायला उठतं आणि यातून अनेकदा आपल्या हिंमतीचं खच्चीकरण होतं...


काळजाआडच्या सुया...



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

शब्दांचे छुपे वार सर्वात वाईट...घाव नि जखमा अदृश्य असल्या तरी अंतर्मनात खोलवर रुतून घुसमटत राहतात...

घुसमट...



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

 
क्षणभंगुर असतात काही गोष्टी, काही क्षण, काही आठवणी, काही प्रश्न नि काही उत्तरं... जीवन जगायचे तर काहीतरी तोडगा काढावा लागतो. क्षणभंगुर क्षणांना जगण्याच्या गणितात गुंफावं लागतं...!

क्षणभंगुर...

क्षणभंगुर असाव्यात वेदना
पण कोणत्या ?
जणू अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न
एक दीर्घ श्वास घेऊन
स्वतःशीच केलेला...
नकळत येऊ घातलेल्या
की स्वतःच स्वीकारलेल्या
की अनुत्तरित राहिलेल्या
की प्रश्नात गुंतलेल्या
की कधी न जाणवलेल्या
की फक्त शंकेतल्या
की खरंच क्षणभंगुर ???
उत्तराखातर उभे ठाकलेले
नवे प्रश्नच प्रश्नावलीतले...
विलक्षण क्षणांची
क्षणात चाळणी करणारे...
क्षणभंगुर क्षणांच्या
असंख्य वेदनांचे घाव
गुंतलेल्या मनाशी खेळ करत
सळसळत्या भावनांत
खोल रुतून बसलेले
क्षणिक वाटणारे...
कधीतरी शोधावे लागते
अन् साधावे लागते गणित
रडत, कुथत हरवलेले
प्रश्न वेदनादायी उत्तरातले
निसटलेल्या भावनांतले
शेवटी फक्त जगण्यासाठी...


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
 
 एका व्हाट्सअँप समूहाच्या उपक्रमावर मी दिलेला काव्यरूपी अभिप्राय...
 
सध्याचे ऑनलाईन तांत्रिक शिक्षण आणि शाळेतले पारंपरिक गुरु-शिष्य शिक्षण यांतील वास्तविकता आणि भविष्य यावर भाष्य करणारी कविता...!!!

शाळा बंद पडल्या तर...

शाळा बंद पडल्या तर लहान मुलांचं
शिक्षणाशिवाय काय भविष्य असणार
मौजमजेतल्या अभ्यासाविना त्यांना
इंटरनेटवरचं उपाशी आयुष्य भेटणार...

शाळा बंद पडल्या तर आपण सर्व
जणू अडाणीपणातलं जीवन जगणार
अंधश्रद्धेचं खायला उठेलेलं हे जग
ज्यात नैतिकतेचं भानच मुळी नसणार...

शाळा बंद पडल्या तर विद्यार्थी
शाळेचा शैक्षणिक अनुभव कसे घेणार
आता ऑनलाईन तंत्रज्ञानाशी त्यांचा
मेळ बसण्यास खरंच वाव मिळणार...

शाळा बंद पडल्या तर ज्ञानाच्या
कक्षा गुरुविना कशा रुंदावणार
शिक्षक जीवन मूल्ये सांगणारा
गुरु म्हणून शिष्य कसा घडवणार...

शाळा बंद पडल्या तर मानव
प्रगतीचा मार्ग कसा गाठणार
उद्योग, व्यवसायासारख्या क्षेत्रात
शेवटी समाज अज्ञानीच राहणार...

शाळा बंद पडल्या तर असंस्कारी
समाजाची रचना कशी बदलणार
फायदा, नुकसान, विज्ञान नि
अज्ञान वैचारिक कसे बरे होणार...

शाळा बंद पडल्या तर शैक्षणिक
पैशांचा बाजार कसा थांबवणार
तंत्रज्ञानाचा उपयोग विकासशील
पद्धतीतून खरंच साध्य करणार...

शाळा बंद पडल्या तर करोडो लोक
देशाचे सुजाण नागरिक कसे बनणार
माणुसकी, संवेदनशीलता, नियम
सगळेच बासनात गुंडाळले जाणार...

शाळा बंद पडल्या तर निरक्षरता
माणसात अराजकता फैलावणार
सहकार्य, आदरभाव या गुणांचे
मुलांमध्ये मूल्यांकन कोण करणार...

शाळा बंद पडल्या तर भकासतेच्या
वातावरणात मुलं एकाकी पडणार
अनेकविध कलागुणांच्या संपन्न
नौकेत विराजमान कसे होणार...

शाळा बंद पडल्या तर भावनांची
उघड गुलामी वाट्याला येणार
प्रेम, निरागसता, आदर, सन्मान
यांची स्वायत्तता हिरावली जाणार...

शाळा बंद पडल्या तर पालकांची
सततची घालमेल होत राहणार
मुलांच्या उज्वल भवितव्याची
एक वेगळीच चिंता सतावणार...

शाळा बंद पडल्या तर मैत्री नाते
कोवळ्या वयातले कसे फुलणार
अनोळखीत आपलेपणाचा भाव
विद्येविना कसा योग्य पारखणार...

शाळा बंद पडल्या तर उगाच भर
बेशिस्त समाजकंटकांची होणार
नसता सामाजिक बांधिलकीचे भान
व्यक्तिमत्व विकास कसा साधणार...

शाळा बंद पडल्या तर मुलांचा
उपद्रवी त्रास कुटुंब रोजच भोगणार
घरात आरामात, शिस्त मोडून
भांडणांचा उपहास करत बसणार...

शाळा बंद पडल्या तर मुलाच्या प्रगती
पुस्तकाविना शाबासकीला अर्थ नसणार
खडू, फळा, लळा नि जिव्हाळा यांत
न रमता शिकण्यात काय मजा उरणार...

शाळा बंद पडल्या तर गरीबाची मुलं
प्रगत शिक्षणाचे धडे कसे गिरवणार
विद्येचे हे माहेरघर चार भिंतींविना
अंती अपूर्णच का हो आता राहणार...


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
सीमेवरच्या सैनिकांसाठी आणि अनेकांच्या सैनिक होण्याच्या स्वप्नासाठी...!!!

मी सैनिक झाले/झालो तर...



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

सर्व प्रेमळ, काळजी घेणाऱ्या मैत्र-मैत्रीण अशा परिवाराला समर्पित...!!!

मैत्रीचा रंग तुझ्याविना... 



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
विषय संकल्पना: रोहित सुर्यवंशी
शब्द संकलन: वर्षा शिदोरे 


"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..."




(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
लघुकथा लेखन

भावनांची सजीव पणती...

दिव्या, भारती आणि सुमन या बालपणीच्या तीन मैत्रिणी एका पणतीसाठी भांडता आहेत हे पाहून त्यांच्या शेजारून जात असलेल्या जोशी काकूंनी त्यांना विचारले, “अगं मुलींनो, तुमच्या या मोठमोठ्या गोंगाटाचा त्या बिचाऱ्या पणतीला का म्हणून त्रास ?”

सुमन काहीशी नाराजीतच म्हणाली, “ काकू, खूप सुंदर व आकर्षक आहे खरं ही पणती पण बिचारी वगैरे काही नाही हं...! तिच्यासाठीच तर आम्ही तिघी भांडत आहोत. शेवटची उरलेली होती मग आम्ही तिघींनी ठरवले, की घरी घेऊन जाऊ आणि निर्णय घेऊ, ही कुणाकडे राहील याचा...”

“परंतु गेले दोन तास झाले आमचं काही ठरतच नाहीये. आम्हाला सर्वांना ती हवीये”, दिव्या सुमनला मधेच थांबवून म्हणाली.

“आणि काकू, आम्ही सगळ्या बालमैत्रिणींनी मिळून ही सुंदर पणती अकबर चाचाकडून खरेदी केली आहे. आता तिची विभागणी तिघींमध्ये कशी करणार तो प्रश्न आहे..”, काकूंचा प्रश्नार्थक चेहरा पाहून भारती म्हणाली.

“तुम्ही गेले दोन तास पणतीसाठी भांडण्यात घालवले...?”, जोशी काकूंनी आश्चर्याने विचारले.

“नाही काकू. आम्ही आधी दीड मस्त खेळ खेळलो. खूप मजा केली. पण आता थकलो म्हणून तेवढ्या वेळात पणतीचा वाटणी करू म्हटलं !”, काहीसे हसत आणि निर्वाणीच्या स्वरात भारतीने सांगितले.

“अच्छा...तुमचा संवाद नि भांडण तसे गंभीर आहे. पण मला आधी एक सांगा पणती निर्जीव की सजीव..?”, काकू विचारत्या झाल्या.

“कदाचित निर्जीव असावी का...? कारण आम्ही शिकलो आहोत ना शाळेत, सजीव व निर्जीव म्हणजे काय ते. हो ना गं दिव्या ?”, सुमनने दिव्याला प्रश्न केला.

“हो. सुमन तू बरोबर बोलते आहेस. जसे आपण सगळे सजीव आहोत. आपल्यात प्राण आहेत, हालचाल करतो, एक जीव आहोत. असा या पणतीत तर एकही गुणधर्म नाही. शिवाय वस्तू तर निर्जीवच असतात. आपल्या विज्ञानाच्या सदाफुले बाईंनी शिकवलेला सजीव-निर्जीव धडा मला चांगलाच आठवतोय...”, सुमनच्या मताला दुजोरा देत दिव्याने स्पष्टीकरण दिले.

“अम्म्म... निर्जीव पण हो...ती आपल्याला खूप काही शिकवते त्यामुळे सजीव...”, काहीशी गोंधळून गेलेली दिव्या म्हणाली.

“हो ना... आणि एकदा विशाल दादा म्हणाला होता...
मिटवून अंतर्मनातला अंधकार
प्रवास तिमिरातुनी तेजाकडे...
पेटवून आशेची पणती ज्योत
जाऊ नव्या आत्मविश्वासाकडे...”
दादाच्या या ओळी आठवून सुमन म्हणाली.

“वा...हुशार आहात तुम्ही सर्वच बालसवंगड्या ! बरं... एक काय ते अखेरचं उत्तर...?”, जोशी काकू मिश्किल हसत म्हणाल्या.

“सजीवच असली पाहिजे. कारण जिच्यामुळे आपल्याला भावना कळतात आणि जिच्यासाठी आम्ही भांडलोही मग ती निर्जीव कशी असेल...? तिच्यात लपलेल्या अदृश्य भावना असल्या तरी तिच्याविषयी आपल्या भावना जोडलेल्या आहेतच. आता समजलं. काकू, तुम्ही मघाशी का म्हणाल्या बिचारी पणती असं !”, एवढा वेळ शांत असलेली भारती काकूंकडे पाहून उद्गारली.

“बरोबर...! फक्त आपण शिकलेले पुस्तकी विज्ञानी ज्ञानच सजीव-निर्जीव गुणधर्ण ठरवत नाही. भावनाही बोलक्या असतात. कधी आपल्या तर कधी वस्तूंच्या. आपल्या घरातल्या वस्तू जसे टेलिव्हिजन, फोटोप्रेम, स्वयंपाकघरातल्या वस्तू, आपले कपडे इत्यादी वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांचे आणि आपल्यातले भावनिक नाते दुसरा कोणी समजू शकत नाही. ‘अनुभवाचे भावुक, भावनिक बोल’ आता तुम्ही शिकलात. मग काय ठरलं पणती कुणाकडे बरं राहणार ?”, काकूंनी उत्साहाने विचारले.

“आम्ही सगळ्या मिळूनच तिला प्रेमाने जपू, तिचा आळीपाळीने योग्य वापर करू, तिला स्वच्छ ठेऊ, कधी वेगळ्या रंगांनी सजवू पण पुन्हा कधीच भांडणार नाही काकू...”’ तिघी जणू एकसुरात आनंदाने किंचाळल्याच.

जोशी काकू खाली ठेवलेल्या हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या उचलून त्यांच्या घरात शिरल्या. तशा दिव्या, भारती आणि सुमन पुन्हा खेळण्यात दंग झाल्या.


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
लेख लेखन  

सौंदर्य चारित्र्य

“बाह्य सौंदर्याची जरी खाण
विचारांतून हवा साजेसा मान
मनाला पटणारा आत्मविश्वास
मग आपोआप पचतो अपमान”

               खरं पाहिलं तर बाह्यरूपी सौंदर्य महत्वाचं वाटतं अनेकांना आणि भुरळही घालतं अनेकदा. ते कधी उघड नसेल व्यक्त केलं जात पण मनात कुठेतरी दडलेलं असतं. कधी आपल्याच वागण्या-बोलण्यातून जाणवतं तर कधी इतरांच्या नजरेतून. मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं-मनाचं जे हृदयाला साद घालतं ते की चेहऱ्यावरचं जे अगदीच असतं उघड....कसं बरं ठरवणार ?

              तसेच, सौंदर्य म्हटलं की ‘स्त्री’ असं जणू त्रिकालाबाधित सत्यच ! त्यामुळे खरी मानसिकता दडून राहते. ती कालांतराने समोर येतेही. कुणाच्या हव्यासापोटी गुन्हे, अपराध घडतात तर कुणाच्या अविवेकी, गंज लागलेल्या बुद्धीच्या अतिरेकामुळे बदलाचा भयानक काळ दिसतो. अशा मानसिकतेला बदलणं जितकं सोपं तितकंच अवघड.

“स्त्रीला वाटायला लागली आहे
अस्तित्वासाठी सौंदर्याची शिक्षा
बदलावी आता विकृत मानसिकता
वेळोवेळी का द्यावी लागे परीक्षा”

             क्रूरपणे शरीर जाळणाऱ्या नराधमास ‘ती’चं कपड्यांवरून ठरणारं सौंदर्य महत्वाचं वाटलं नि तो आकर्षित झाला असा उघड न्याय दिला तर त्याच्या मनातल्या विकृत विचारांशी आणि तिच्या अस्तित्वाशी अन्यायच ! अशा मानसिकतेतून नकारात्मक व्यक्तिमत्व वैचारिक जगासमोर येत असताना ‘सौंदर्य’सुद्धा नकारात्मक होईल की काय अशी शंका घेण्यास जागा उरते. त्यामुळे हे चित्र पालटले पाहिजे. तेच हितकारी ठरेल.

             व्यक्तिमत्व पेहरावाने खुलतं खरंच आहे हे ! पण पेहरावही आपल्या दिसण्या-वागण्याला साजेसा असावा लागतो, हे नव्यानं सांगायला नको.... ते म्हणतात ना....अंगापेक्षा बोंगा नसावा मोठा ! परंतु अंतर्मन शुद्ध असेल तर सभोवतालच्या वातावरणासोबत आपलं व्यक्तिमत्वही खुलतं. मनापेक्षा सुंदर, निष्पाप आणि शुद्ध दागिना शोधूनही सापडणे नाही ! आपल्या मनावरचा चांगल्या-वाईट विचारांचा पगडा खूप मोठा आणि विस्तृत आहे तसा. मनाला पटतं की जनाला हे तेवढं आत्मविश्वासाने आपल्यासाठी आपण ठरवायचं. कारण विचारांचं शस्र असो वा शास्त्र, नसेल पटत तर वापरयाचं नाही आणि झुगारून पुढे जायचं. फक्त आपला निर्णयही योग्य असू शकतो हा विश्वास कायम असणं महत्वाचं !

             आपल्यासाठी आपलं अथवा दुसऱ्याचं कोणतं सौंदर्य का म्हणून महत्वाचं ते आपल्याला जाणता आलं पाहिजे. कुणी कितीही गाथा गायली, ब्रह्मज्ञान सांगितलं तरीही आपल्या विचारांचं योग्य-अयोग्य असणं शेवटी आपल्या मनाला लवकर पटतं. विवेकी निर्णयक्षमता प्रत्येकात असते. आपला कोणता गुण कुठे आणि केव्हा वापरावा याचं ज्ञानही यातूनच मिळतं. 'चारित्र्य' नावाचा ग्रंथ याच विचारांतून घडतो, फुलतो....!!!

“चारित्र्याला गालबोट लावणारा
सौंदर्य गुण नसावा निव्वळ देखावा
विश्वासाचं सुंदर बीज खुलवणारा
अंतर्मनाचा त्यात साथीदार हेरावा ”


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
अलक (अति लघु कथा)

कर्तव्य काळजी

आई: प्रिया, आज इतकी का सुकून गेली आहेस तू..?
प्रिया: अगं आई, माझे पीरिअड्स आहेत.
आई: अगं, मग थोडा आराम कर बरे वाटेल.
प्रिया: हो आई पण उद्यासाठी सॅनिटरी पॅड्ससुद्धा संपले आहेत. माझी इच्छा नाही बाहेर जायची.
बाबा: मी घेऊन येतो. मला नाव सांगा. आलोच मी घेऊन !
प्रिया: बाबा, तू आणणार...?
बाबा: हो मग ! अगं, मी तुझा बाबा आहे बेटा. अशावेळी तुमची काळजी कशी घ्यावी याची संपूर्ण माहिती मी वाचली आहे. काळजी नसावी. आणि हे तर माझे कर्तव्यच !
(महिलांच्या शारीरिक समस्या आणि उपाय याबद्दल माहिती ठेवणे हे पुरुषांनी आपल्या परिवाराच्या काळजीचा कर्तव्यभाग समजावा हे यातून साध्य होते.)


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
५ जून...जागतिक पर्यावरण दिन विशेष ललित लेख

पर्यावरण रक्षक...

                    परोपकाराच्या नावाखाली कित्येकदा लुटले स्वतःचेच अस्तित्व. कधी नकळत, कधी निःस्वार्थाच्या खोट्या मथळ्यांखाली. विकास नि प्रगती नांदता घरी जणू पर्यावरणाची रयाच गेली ! निसर्गाच्या शानशौकतीला इतके छेद केले की आज रक्षक भक्षक झालाय असे म्हणायला निर्विवाद दाद मिळेल.

                    कुठे ती नैसर्गिक हिरवळ नि आता दारातल्या बागेतली कृत्रिम ‘लॉन’. आरोग्यदायी जीवनासाठी वैज्ञानिक उपाय करता करता नैसर्गिक जंगले, पर्वत, धरतीचे रूप, वृक्ष नवलाई, नदी, नाले, समुद्र इत्यादींनाच जणू महामारीने झपाटले आहे.

                      मानवनिर्मित प्रदूषणाची काय ती भलीमोठी जंगले, वादळे, प्लास्टिक पॅच, महासागरातले जाळे, वितळलेल्या बर्फाचे उघड दालन, अग्नीच्या ज्वाला ज्यांच्यासमोर मनुष्याच्या प्रगतीचे पुराणही फिके ! हवामान बदलांचे हे जाळे ऋतुमानही हिरावून घेत आहे. पण पाहायला गेले तर आभासी जगतातले निसर्ग माणसाचे खरे जीवन झालेय. खुल्या आकाशाखाली त्याचे घर आहे पण खुले मन नाही, त्याचे दुःख उघड आहे पण सुख नाही, त्याच्या ठायी चिंता आहे पण आनंदी जीवन नाही.
                                                                                                                                              
                      तेव्हा पर्यावरणाच्या ह्रासाचे कारण होण्यापेक्षा त्याचे रक्षक व्हावे, त्याचे भक्षक होण्यापेक्षा त्याचे संवर्धनकर्ते व्हावे. प्रदूषणाची मात्रा कमी करण्याचा प्रयत्न करावा, वृक्षारोपण करावे, प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासुन करावी, उजाड धरतीला शाश्वत भविष्यासाठी, पिढीसाठी सुशोभित करावे.

“व्हावे रक्षक, नको उगा भक्षक
स्वतःच्या उपजीविकेचा सन्मान
सर्वांना खरंच हवी असल्यास
निरोगी पर्यावरणाची साथ छान”


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा