सोमवार, २७ जानेवारी, २०२०

एका मुलीच्या मनातलं...

बाबा काहीतरी सांगायचंय...

तुमच्या स्वप्नाळू परीला कोणताच नाही आहे त्रास
मानसन्मानाचा विनाकारण नाही कोणताच घाट
जीवनाच्या चांगल्या, वाईट आशांवर निर्विवाद
तुमचा प्रत्येक शब्द जणू अनमोल आशीर्वाद
तुमच्या कष्टाचं ऋण मुळीच नाही फेडायचं
ते शक्य नाही सगळं आयुष्य जरी मी झुरलं
ओरडण्यात तुमच्या दिसत असते काळजी
आईच्या कुरकुरण्याविरुद्ध मिळते साथ तुमची
दुर्लक्ष कधी तुमच्याकडे माझ्याच व्यापात होते
आठवणीने आठवण फक्त तुम्हालाच तेव्हा येते
पण बाबा मला काहीतरी सांगायचंय...बोलायचंय
सर्वात आवडता हिरो फक्त तुम्हीच कायम राहणार
आतापर्यंतच्या प्रत्येक निर्णयात फक्त होकार भरलात
पुढेही अशीच मिळेल होकाराची साथ, एवढंच हवं
स्वातंत्र्य बोलायचं, निवडीचं दिलंत तर काळजी सोडा
परीला तुमच्या स्वतःच्या हातात सत्ता तर देऊन पाहा
आजपर्यंत सगळं सांभाळलं तुमच्या खांद्याला खांदा देऊन
आता फक्त पाठीवर हात ठेऊन धाव म्हणून तर पाहा
तुमच्या कष्टाला जागण्याची एक संधी तर देऊन पाहा
मुलांपेक्षा मुलीला जपणारा तुमच्यासारखा माझा बाबा
म्हणजे नक्कीच, सर्वात नशीबवान आहे रे मी बाबा
कोणाच्याच विरोधाला तुम्ही कधीच नाही पडला बळी
मुलीच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच राहिलात उभे
अशीच साथ आयुष्यभर मिळत राहो, एकच मागणी... 


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

२६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन 

विविधतेने नटलेल्या मनांत
भारतभूमीच्या वारसाचा ठेवा
सगळेच एकतेत नटलेले
प्रतीक शांततेचे जपलेले

सर्वधर्मसमभाव ब्रीद देशा 
शिकवण माणसास अशी 
स्वातंत्र्य, समता, बंधुता
शान भारतीय संविधानाची 

हक्कास पुरेपूर कर्तव्याची
जोड आपुलकीच्या भावनेची
मान सर्वास असा समानतेचा
तिरंगा बहुमान या देशाचा

भारतवीरांच्या श्वासाश्वासातून
देशप्रेमाचा वाहतो प्रेमळ झरा
एकदुसऱ्याचे करूया संरक्षण
ध्यास महान देशाच्या प्रतिष्ठेचा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

 माझ्या ‘स्मितरहस्य’ या काव्यसंग्रहाच्या मनोगताचे (मलबर- पुस्तकाचे शेवटचे पृष्ठ) सरांनी आपल्या आवाजात खूप छान रेकॉर्डिंग केले आहे. त्यास सरांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील अनेक मोठ्या हस्तींचा अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. सरांनी सर्व वृत्तांत सविस्तर ऐकवला त्याबद्दल सरांचे आभार. मनोगत अनेकांना प्रेरणादायी आणि आशादायी वाटले, अनेकांनी त्यातील भावार्थ समजून घेतले. त्यासाठी मी अतिशय ऋणी आहे.

माझे मनोगत सरांना अतिशय भावले आणि त्यांनी माझ्या कार्याबद्दल कौतुकाने मला हे ’सरप्राइस’ दिले त्याबद्दल लेखक,कवी राहुल गुरव यांचे खूप खूप आभार...!

आपली,
लेखिका,कवयित्री वर्षा शिदोरे


माझी कविता “अंत मनाजोगता रंगवणारा” रेडिओ एफएम १०७.८ पुणेरी आवाज वर...आरजे कैलास...
धन्यवाद..!

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

विसरुनी कटुतेचे कडवे घोट
शब्दात तिळगुळाचा गोडवा
साठवावा सदैव हृदयात....
उंच उंच पतंग संगे नातीबंध
अखंड झेपावा आयुष्याचा
जगावा
सोहळा सुखाचा....

मकरसंक्रांतीच्या अनेक शुभेच्छा....!!!

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

मायेची उब...
 

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

युवा विश्वकर्ता....
 
युवा भावी विश्वकर्ता
वेध समग्र कयास
क्रांती ब्रीद परिवर्तन
हित शाश्वत विकास

जागर विचारांचा मनी
संकलसिध्दीची प्रेरणा
सन्मानाचा ध्यास नवा
विवेकानंद उद्याचा 

भविष्याचा विचारी शासक
लक्ष्यवेधी माणूस घडावा
समाधानी त्यागी उपजावा 
अमूल्य ठेवा जपावा 

सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा...!

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शौर्यवंत कीर्तिवंत राज्ञी...

महानतेचं स्मरण
जिजाऊ सम्राज्ञी माता
शौर्य दिव्य मूर्तिकार
सन्मानाचा खरा त्राता

महतीचा अविष्कार
लढवैय्या शूर नारा
वीरता थोर महान
कर्तृत्व विराट बाणा

मानापमान गिळला
तिलांजली संसाराला
तेववली स्वपताका
जनजग सुखावला

विराज्ञी दमणकारी
गुलामीपासूनि मुक्ती
स्वराज्याचा पाया उभा
रचिली अभेद्य कीर्ती

महा आदर विश्वात
लोकप्रिय व्यक्तिमत्व
घराघरात नांदतं
प्रेरणादायी माहात्म्य

मौल्यवान दिला ठेवा
दौलत डोलती शान
स्तुत्य शिवबा नि संभा
भावी अभिमानी मान 


राजमाता जिजाऊ जन्मोत्सव....१२ जानेवारी
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
स्पर्शाचं गाणं... 



मंगळवार, ७ जानेवारी, २०२०



To Everyone, Writers and Writers to be.....



Dedicated to my best, cutest and loving Niece आयरा....
Memories...१० डिसेंबर २०१८-१९

पहिला स्पर्श...
 




Language Services Bureau निबंध लेखन स्पर्था २०१९ मराठी
तिसऱ्या (पदवीधर/पदव्युत्तर व इतर गट) गटात द्वितीय बक्षीस 




'हवामान बदल' या समस्येवर काम करणाऱ्या तरुणांच्या कार्याबाबत तुमचे विचार (फ्राइडेस फॉर फ्युचर /ग्रेटा थनबर्ग)

"हवामान बदलांचा वेध नवा पर्यावरणाचा विडा
जीवनदायी आरोग्यसंपदेचा ध्यास बाळगूया वेडा"

जसजसं जग मानवाच्या कवेत येत चाललं तसतसं पर्यावणाचं रूप अधिक गंभीर, उद्रेकी होऊन जीवनाचा प्रश्न अधिक जटिल व्हायला सुरुवात झाली. 'वसुधैव कुटुम्बकम्' अशी संस्कृती असलेले आपले विचार आपल्याच अमानवी कृत्यांमुळे बळी चढताना दिसत आहेत. ज्यामुळे आपले तसेच आपल्या पुढील भविष्याचे जीवन आपणच दूषित करत आहोत. याचा परिणाम म्हणून अनेकार्थाने आपल्या आरोग्याच्या घातक समस्यांना वाचा फोडताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तिचा योग्य मार्गांनी वेध घेणे जास्त जरुरी होऊन बसले आहे. जाणिवांची जाण योग्य वेळी होते तेव्हा सुरुवात ही करायलाच हवी, हा संघर्षाचा अचूक मार्ग चोखणे काळाची गरज बनली आहे. 'हवामान बदल' हा कळीचा मुद्दा ठरत असतांना प्लास्टिकमुक्त देश, स्वच्छता अभियान या अशा चळवळींनी आपला गाडा योग्य मार्गांनी हाकायला विविध देशांनी सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या सुकर पर्यायांनी अशी सकारात्मक वाटचाल खऱ्या अर्थाने चालू झाली आहे. सध्या गाजत असलेल्या हवामान बदलांच्या समस्यांना एक दूरदृष्टी मिळत आहे.

युएनच्या हवामान परिषदा, पर्यावरण अभियान, कॉप परिषदा, पॅरिस कायदा, चर्चासत्रे तसेच देशांतर्गत आयोग, चळवळी, समित्या आणि यांचे अहवाल यांमुळे हवामानाची बिघडत चाललेली दुर्दशा डोळे उघड करायला देशवासियांना मदतगीर ठरत आहे. त्यामुळे आज जगात कुठे नाहक हिमवृष्टी, बर्फ वितळण्याने गैरसोय, आपत्ती अशा हवामान बदलांमुळे होणाऱ्या समस्या का आणि कशा उद्भवत आहेत याची प्रचिती देण्याचे महत्वाचे काम त्या करतात. आपले जीवन नि भविष्य धोक्यात आहे हेच मुळात लक्षात येणे माणसात अजून जाणतेपणाची जाण आहे हे दर्शवते. लढाई मुश्किल असली तरी नामूमकिन नाही हे प्रेरणादायी आहे.

हवामान बदल ही समस्या सोडवणे नेटाने लढा देऊन आपल्या विचारांत परिवर्तन करून, समाजभान जपून आणि सुरुवात स्वतःपासून करण्याने साध्य होणार आहे. याचेच समाजभान ठेऊन 'शाश्वत हवामान/आरोग्य' यावर सखोल भाष्य करणाऱ्या अनेक पर्यावरणवादी, कार्यकर्ते या आणि अशा वर्गांमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा समावेश आज वाढतो आहे. उद्याचं जग गाजवणारी, जगवणारी तरुण पिढी प्राधान्याने कचरता 'माझ्या नि माझ्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचं काय?' असा सवाल करतेय. त्यात नेटाने पुढे आलेल्या आणि आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या स्वीडनच्या युवा पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग (१६ वर्ष) ! यांच्या आधी अलेक्झांड्रिया व्हिलासोर (१४ वर्ष),  इसरा हिरसी (१६ वर्ष), झिये बस्तीदा (१७ वर्ष), विक बॅरेट (२० वर्ष), केटी एडर (१९ वर्ष) यांसारख्या तरुण कार्यकर्त्यांनी जोमाने आंतरराष्ट्रीय हवामान परिषदांमध्ये आपले विचार, सवाल उपस्थित केले.

'फ्राइडेस फॉर फ्युचर' हा उपक्रम गाजवणाऱ्या ग्रेटा थनबर्ग यांचा मागील वर्षाच्या (२०१८) ऑगस्टपासून दर आठवड्याला शुक्रवारच्या दिवशीचा हवामान किंवा भविष्यासाठी शाळेचा संप जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. दर शुक्रवारी स्वीडिशची राजधानी स्टॉकहोम येथे संसदेच्या बाहेर बॅनर ठेवले जाते. या माध्यमातून नेते सामान्य लोकांना जगजीवन वाचविण्याचे आवाहन केले जाते.

संयुक्त राष्ट्र हवामान चर्चेत (सीओपी २५-माद्रिद,स्पेन) 'व्यवसाय क्षेत्र आणि राजकारणातील नेते हवामानाच्या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल करत आहेत', असा आरोप ग्रेटा थनबर्ग यांनी राजकारण्यांवर लावला तर 'मतभेद बाजूला ठेवा, एकत्रित या आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करा', असे भाष्य भारतातील मणिपूरची लिसिप्रिया कांगुजाम ( वर्ष) हिने केले.

या तरुणांना जीवनाबद्दलची जाण आपल्या उमद्या वयातंच होतेय हेच खूप सुखावणारे आहे. प्रश्न करण्याची आणि तेही थेट विचारपूर्वक, योग्य वेळी, योग्य ठिकाणी भिडण्याची हिंमत खरंच अभिमानास पात्र आहे. आज देशाचा 'जागृत शाश्वत वारसा' चालवण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज भासत असतांना अशा जागृत प्रश्नांमुळे नक्कीच उज्ज्वल भविष्याची वाट देशांना गवसेल याचं जिवंत रूप पाहायला मिळतंय.

'पर्यावरणाचे रक्षण करा, जीवन अधिक सुखकर करा', असे कित्येक महानांचे कर्तव्यब्रीद आज तरुण पिढी आपले आद्य कर्तव्य म्हणून उचलून धरतेय. या मागची त्यांची तळमळ अनेकांनी वाचून, बोलून दाखवली. त्यांचे प्रश्न अनेकांना रास्त वाटले या पेक्षा दुसरे समाधान नाही. या निमित्ताने कुठूनतरी सुरुवात होताना दिसतेय. ही सकारात्मक बाब भविष्यात अशा अनेक तरुण पर्यावणवाद्यांच्या तसेच नेतृत्वगुण असणाऱ्या नेत्यांच्या, राजकारण्यांच्या, जागृत नागरिकांच्या जन्मास कारणीभूत ठरेल. ज्यामुळे हवामान बदलांचे रोख बदलून 'स्वच्छ, शाश्वत, सुंदर वातावरण, हवामान आणि अर्थातच जीवन' आपण नक्कीच भविष्यात अनुभवू शकू.

"पंख फुटतात विचारांना
कवेत दिसतं भविष्य ज्यांना
उद्याचा प्रश्न आज डोळ्यात
कवडसे समाधानाचे जाणिवांत
हवामान बदलांचे सुटतील वांधे यातून"
  
- वर्षा शिदोरे, नाशिक 

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

हर्ष गुलाबी गारवा..

झोंबणारा थंड वारा
वर ही थंडी गुलाबी 
रोखुन राहिलेल्या
या तुझ्या नजरा शराबी

नकळत अलगद तुझ्या 
मिठीत मग कैद होऊन जाणे
एकसंध एकसारखे आणि 
आपले एकरुप होणे

बंध कसा सोडवावा मग
आता ह्या लुप्त भावनांचा
अपराध हा तुझा माझा 
की हा दोष गारव्याचा...

झरे नात्यात उल्हासाचे 
संगीत संथ वाऱ्याचे 
गाणे कुडकुडत्या ओठांचे 
नाच वेड्याखुळ्या मनाचे 

सुगंध आपुल्या तणाचा 
मनसोक्त वाऱ्यात मिसळला 
बेभान बेधुंद शब्दांचा 
गारवा आवाजात जाणवला 

मिठीत येता कुशीत निजणे 
ऋतुचक्राचा खेळ साजरा 
अशांत जीवाला सुखावणारा 
भावनांना प्रेमाचा दुजोरा
(स्वलिखित-by self)  
First Duet with Dhiraj(Writer to be...)
© धीरज_मोरे
© वर्षा_शिदोरे